Saturday, August 20, 2016

आ.ह. सरांचे निरर्थक चार्वाकस्तोम

महाराष्ट्रातील अन्य विद्वानांच्या तुलनेत डॉ. आ.ह.साळुंखे यांनी चार्वाकमताचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी चार्वाकावर चक्क पी.एच.डी. च केली असून ‘चार्वाक दर्शन’ नामक पुस्तकही लिहिलं आहे.
डॉ. आह हे चार्वाकमताचा पुरस्कार तर करत असतातच, पण त्याला त्यांनी ‘आस्तिक शिरोमणी’ ही ठरवून टाकलं आहे. तसं ते ठरवण्यापूर्वी त्यांनी दयानंद सरस्वती आणि विवेकानंद या दोघा महत्वाच्या धर्माज्ञांनी केलेलं चार्वाकमताचं खंडन विचारात घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या पुस्तकाला काहीसा अपूर्णपणा प्राप्त झालेला आहे. तथापि दयानंद आणि विवेकानंद यांच्या खंडनाचा फारसा विचार न करता या पुस्तकातील काही मुद्द्यांचा परामर्श मी स्वतंत्रपणे इथे घेत आहे.

१.       चार्वाक या शब्दाचा अर्थ डॉ. आह हे ‘चारु वाक’ म्हणजे ‘गोड बोलणारा’ असा लावतात. मात्र दयानंद यांनी ‘चार वाक’ म्हणजे ‘वितंडवाद घालत बसणारा’ अशी व्युत्पत्ती सांगितली आहे. शिवाय ‘चारु’ या शब्दाचा अर्थ ‘सुंदर’ असा होतो, ‘गोड’ असा होत नाही. एखाद्याचं बोलणं गोड आहे असं सुचवायचं असेल तर त्यासाठी ‘इक्षु’ किंवा ‘मधु’ असा शब्द योजावा लागेल. आर्यांच्या पहिल्या राजांपैकी एक जो ‘इक्ष्वाकु’ त्याच्या नावाचा अर्थ ‘गोड बोलणारा’ असाच होता. कारण इक्षु म्हणजे (गोड रस देणारा) ऊस. पण इथे मुख्य समस्या वेगळीच आहे. चार्वाकांच्या बाजूने विचार केला तर ते गोड किंवा सुंदर बोलत नसून ‘सत्य’ किंवा ‘परखड’ बोलत होते असं म्हणणं संयुक्तिक होईल. मग ‘चारु’ हा शब्द वापरायचा संबंध येतोच कुठे ? त्यामुळे आह यांनी ओढून ताणून लावलेली ही व्युत्पत्ती स्वीकारता येत नाही.

२.      चार्वाकांचे स्वतःचे ग्रंथ आज उपलब्ध नाहीत. त्यांचं जे काही तत्वज्ञान माहीत झालंय ते वैदिक वाड्मयातून त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळेच माहीत झालंय हे डॉ. आह यांना मान्य आहे. मात्र उदयन राजाची पुराणातली एक वेडगळ कथा देऊन त्यावरून ‘वैदिकांनी चार्वाकांचे ग्रंथ जाळलेही असतील’ असा निष्कर्ष काढून ते मोकळे होतात. परंतु हा पुरावा समाधानकारक वाटत नाही. कारण त्यात बुद्धीला न पटणारे काही चमत्कार दिले आहेत. शिवाय जो उदयन राजा भासाच्या दोन नाटकांचा व कथासरीत्सागर वगैरे अनेक ग्रंथांमधल्या कथाकवितांचा सालस, उदार, सभ्य व शूर नायक होता त्याचा या कथेतला आततायीपणा पटण्यासारखा नाही. वादाकरता वैदिकांनी ग्रंथ जाळले असं मानलं तरी चार्वकांनी ते मौखिक पद्धतीने जतन का केले नाहीत हा प्रश्नही उरतोच. कारण मौखिक पद्धतीने प्रचंड वाड्मय जतन करता येतं हे खुद्द वैदिकांनीच सिद्ध करून दाखवलं आहे. खरी गोष्ट अशी आहे की चार्वाकांचे ग्रंथ कधी नव्हतेच तर ते आज मिळणार कसे !

३.      चार्वाकमताची स्थापना देवांचा पुरोहित बृहस्पती याने केली असं मानलं जातं. बृहस्पती वैदिक संस्कृतीपासून दूर का गेला व त्याने चार्वाक पंथ का स्थापन केला याचं कारण सांगण्यासाठी म्हणून आह यांनी एक कथा दिली आहे. त्या कथेप्रमाणे ‘द्विजांचा राजा’ असलेल्या सोमाने एका यज्ञसमारंभातून बृहस्पतीच्या पत्नीला पळवून नेलं. त्यामुळे आर्यांच्या तथाकथित महान संस्कृतीमधील ढोंगबाजी बृहस्पतीच्या लक्षात आली व तो त्या संस्कृतीचा कट्टर विरोधक बनला.
ही कथा आहसरांनी स्वतःच्या मतप्रतीपादानासाठी सोयीस्कर अशा पद्धतीने सादर केली आहे. कारण बृहस्पतीची पत्नी तारा व सोम यांची कथा महाभारतातील वनपर्वात (२१९) आणि देवीभागवतामध्ये (स्कंद १ अध्याय ११) आली आहे व ती कथा काही वेगळंच सांगते.
ती कथा अशी :
पुराणकाळी सोम हा अतिशय सामर्थ्यशाली बनला होता तेव्हा त्याने राजसूय यज्ञ केला.
या यज्ञानंतर त्याच्यावर अभिषेक होत असताना तो एवढा तेजस्वी व देखणा दिसत होता की तिथे उपस्थित असलेल्या नऊ देवता त्याच्या प्रेमातच पडल्या. त्यातही सोमाचा गुरु बृहस्पती याची पत्नी तारा ही तर त्याच्यासाठी प्रेमविव्हलच झाली. त्यानंतर ती स्वतःहून सोमाकडे जाऊन राहिली. बृहस्पतीने निरोप पाठवूनही ती परत आली नाही. म्हणून अखेर बृहस्पती स्वतःच सोमाकडे गेला व त्याची निर्भत्सना करू लागला. तेव्हा सोम त्याला म्हणाला, ‘ती आपणहून इथे येऊन राहिली आहे. मी काही तिला कैद करून ठेवलेलं नाही. जेव्हा तिला ही मौज पुरेशी वाटेल तेव्हा ती तुमच्याकडे परत येईल !’ त्याने त्याला याचीही आठवण करून दिली की (त्यावेळच्या धर्माप्रमाणे) ‘परपुरुषाशी संभोग करूनही स्त्रिया भ्रष्ट होत नसतात.’ नंतर त्याने बृहस्पतीला ग्वाही दिली की ‘तिची पाळी आल्यावर ती तुमच्याकडे येईल.’ तेव्हा बृहस्पती काही दिवस थांबला व पुन्हा सोमाकडे गेला. पहारेकरी आत सोडेनात म्हणून तो आरडाओरडा करू लागला. म्हणून सोम बाहेर येऊन आपल्या गुरूला म्हणाला, ‘तुम्ही असं वेड्यासारखं का बोलत आहात ? तुमची सुंदर पत्नी इथे आहे हे खरं, परंतु संभोगात तुम्ही तिचं समाधान करू शकत नसल्यामुळे ती तुमच्याकडे येऊ इच्छित नाही. नाहीतरी तुमच्यासारख्या भिक्षुकाला असलं स्त्रीरत्न शोभण्यासारखं नाही, त्यापेक्षा तुम्ही एखादी कुरूप स्त्री का निवडत नाही ? एकंदरीत तुम्हाला कामशास्त्राची माहिती आहे असं मला वाटत नाही.’

याबाबत आपण आता अधिक काही करू शकत नाही हे लक्षात आल्यावर बृहस्पतीने इंद्राकडे तक्रार केली. तेव्हा इंद्राने सोमाला जाब विचारला. तो म्हणाला, ‘हे सोमा, तुला २८ पत्न्या आहेत. शिवाय तुझी इच्छा असेल तर तू उर्वशी व मेनका यांचाही उपभोग घेऊ शकतोस. पण गुरु पत्नीशी संभोग करणं ही वाईट गोष्ट आहे.’ तेव्हा सोम म्हणाला, ‘तारा स्वतःहून माझ्याकडे आली होती आणि अजूनही ती आनंदात आहे. ती बृहस्पतीचा तिरस्कार करते कारण त्याने स्वतः ही व्यभिचार केला आहे.’
अखेर युद्धापर्यंत पाळी येऊन ठेपली. तेव्हा ब्रह्माने हस्तक्षेप करून सोमाला समजावलं. सोमाने मग तारा हिला बृहस्पतीकडे परत पाठवलं. त्यावेळी ती गर्भार होती. हे मूल सोमाचं असल्याचं तिने सांगितलं व सर्वांना ते मान्य करणं भागच पडलं. या मुलाचं नाव ‘बुध’ ठेवण्यात आलं. या बुधाचाच इलेपासून झालेला मुलगा म्हणजे विख्यात राजा पुरूरवा.

या कथेवरून हे स्पष्ट होतंय की तारा आपणहून सोमाकडे जाऊन राहिली होती, सोम तिला बळजबरीने घेऊन गेला नव्हता. दुसरं म्हणजे युद्ध न होताच सोमाने ताराला परत पाठवलं हेही या कथेतून दिसतं. डॉ. आह मात्र ‘असुरांच्या मदतीने युद्ध करून बृहस्पतीने ताराला सोडवून आणली’ असं अवाजवी विधान या पुस्तकात करत आहेत. तिसरं म्हणजे आह म्हणतात तसं सोमाने बळजबरीने तारेला आपल्या घरी नेलं असं गृहीत धरलं तरी बृहस्पतीला फार तर सोमाचा राग यायला हवा होता. संपूर्ण वैदिक जमातीचा राग येण्याची काय गरज होती ? शिवाय या प्रकरणात इंद्र, ब्रह्मा वगैरेंनी बृहस्पतीच्या बाजूने मध्यस्ती केल्याचंही दिसत असताना बृहस्पतीला वैदिक संस्कृतीचा उबग येण्याचं कारण काय हेही कळत नाही. हा चक्क वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार झाला. तात्पर्य, बृहस्पती वैदिक संस्कृतीपासून का दुरावला याविषयीच्या आह यांच्या विवेचनात अजिबात दम वाटत नाही.

४.      प्रस्तुत पुस्तकात डॉ. आह म्हणतात, ‘गम्यागम्याचा विचार न करता समागम करणारे ते कापालिक व याज्ञिक होत, चार्वाक नव्हेत ! बृहस्पतीने लैंगिक उच्छृंखलतेला नेहमीच विरोध केला  होता !’ पण आह हे ज्या बृहस्पतीची एवढी कड घेत आहेत त्या बृहस्पतीचं स्वतःचं वर्तन काय होतं याची कथा कुप्रसिद्धच आहे. महाभारतात (आदीपर्व ९८) ही कथा दिली आहे. शिवाय राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ (पृष्ठ ७) या महत्वपूर्ण पुस्तकातही या कथेचा प्रामुख्याने उल्लेख आहे. म्हणजे आह यांच्या निश्चितच ती वाचनात आली असणार. मग त्यांनी वाचकांपासून ती दडवून का ठेवावी असा प्रश्न पडतो. ती कथा थोडक्यात खालीलप्रमाणे,
‘उतथ्य नावाच्या ऋषीची ममता ही पत्नी होती व तिच्यावर त्याचं खूप प्रेम होतं. एकदा उतथ्याचा
धाकटा भाऊ बृहस्पती, जो देवांचा पुरोहित होता; तो थोरला भाऊ जवळ नसताना ममतेकडे गेला व
तिच्याकडे भोग मागू लागला तेव्हा तिने त्याला ती गर्भवती असल्याचं सांगितलं. तरीही तिचं न
ऐकता त्याने तिला बळजबरी करून भोगलं. त्यामुळे तिच्या गर्भावर परिणाम होऊन तिच्या पोटी
अंध पुत्र जन्माला आला, तो म्हणजे दीर्घतमस ऋषी होय.’

जो बृहस्पती आपल्या भावजयीशी संभोग करू इच्छितो व ती गर्भवती असताना आणि ‘नको नको’
म्हणत असतानाही जबरदस्ती करून तिला भोगतो त्या बृहस्पतीची नैतिक पातळी काय असणार हे
वरील कथेवरून उघड दिसत आहे. स्वतः असं अश्लाघ्य वर्तन करणाऱ्या बृहस्पतीला (आणि आह
यांनाही) वैदिकांच्या तथाकथित अनैतिकतेवर तुटून पडण्याचा अधिकार कसा पोहोचतो हे समजत
नाही ! शिवाय या पूर्वी दिलेल्या कथेत खुद्द बृहस्पतीची बायको तारा हीच आपल्या नवऱ्याला
‘व्यभिचारी’ म्हणत आहे ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायला हवी. बृहस्पतीच्या या वर्तनामुळे त्याच्या
चार्वाकीय तत्वज्ञानाला नैतिक बैठक आहे असं मानणं तर्कशुद्ध होणार नाही.
  
५.     व्यभिचारी बृहस्पतीचा कैवार घेणारे डॉ. आह असुरांना वैदिकांपेक्षा अधिक ‘नीतिमान’ वगैरे समजतात आणि चार्वाक तत्वज्ञान बृहस्पती असुरांकडून शिकला असावा असा अंदाज व्यक्त करतात. त्यासाठी ते प्रल्हादालाही जबरदस्तीने चार्वाकांमध्ये ओढायचा प्रयत्न करतात. पण हे सर्व आह यांच्या कल्पनेचे खेळ आहेत. असुर बुद्धिमान व सामर्थ्यशाली नव्हते असा दावा वैदिक वाड्मयात केव्हाही केला गेलेला नाही. किंबहुना ते ‘देवांना तुल्यबळ’ होते हेच वैदिक वाड्मयातून सूचित केलेलं आहे. शिवाय वैदिकांनी शक्य तिथे असुरांशी युती केली आहे (उदा. प्रल्हाद), त्यांच्या कौशल्याचा वापर करून घेतला आहे (उदा. मयासुर) व त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहारही केले आहेत (उदा. भीम-हिडींबा) याचे दाखले पुराणांमधून मिळतात. मात्र असुर हे भोगवादी व जुलमी होते असे आरोप त्यांच्यावर केले गेले आहेत. गीतेत त्यांच्या भोगवादावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. डॉ. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या म्हणण्यानुसार ‘असुषु रमन्ते इति असुरः !’ म्हणजे ‘जे केवळ आपले प्राण टिकवण्यासाठी भोगात रममाण होतात ते असुर होत’. (पहा- ‘दशावतार’) कदाचित म्हणूनच ‘असुर संहारुनी तारावे भक्त’ असं तुकोबांनी म्हटलं असावं. (अभंग ४१३३) त्यामुळे भोगवादी मानल्या गेलेल्या चार्वाकानी असुरांकडून प्रेरणा घेतली असू शकेल, परंतु असुर किंवा चार्वाक ‘नीतिमान’ होते याला कसलाही आधार नाही.

६.      डॉ. आह पुढे म्हणतात, ‘चार्वाक सामान्यतः नास्तिक समजले जातात. पण नास्तिकतेचा आणखी एक अर्थ असून हा अर्थ पाणिनीच्या ‘अस्ति नास्ति दिष्ट्म मतिः’ या सूत्राच्या (४-४-६०) आधारे केला जातो. ‘आहे अशी ज्याची मती आहे तो आस्तिक व नाही अशी ज्याची मती आहे तो नास्तिक’ असं सांगून आह निष्कर्ष काढतात की ‘आहे ते आहे’ असं म्हणणारे आस्तिक आणि ‘नाही ते आहे’ असं म्हणणारे ते नास्तिक असा खरा अर्थ होत असल्यामुळे चार्वाक हेच खरे आस्तिक शिरोमणी ठरतात व अन्य सर्व नास्तिक ठरतात.’

वास्तविक पाणिनीला ‘परलोक आहे असं मानणारे ते आस्तिक, परलोक नाही असं मानणारे ते नास्तिक व दैवावर विश्वास ठेवणारे ते दैष्टिक’ असं म्हणायचं आहे (म.दा.साठे कृत ‘पाणिनी व पाणिनी व्याकरण संप्रदाय’ पृष्ठ ६८) हे पतंजली, कात्यायन व भट्टोजी दीक्षित यांच्यासारख्या महान भाष्यकारांनी स्पष्ट केलं असताना आह अकारण शब्दछल करून अर्थाचा अनर्थ करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचं हे ‘विशफुल थिंकिंग’ आहे एवढाच शेरा मारून त्यांच्या मताची बोळवण करायला हवी.
७.     वैदिक संस्कृतीच्या विरोधात बंड करणाऱ्या चार्वाकांमध्येच एखादा बंडखोर निघतो तेव्हा डॉ. आह यांची कशी धांदल उडते हे जयराशीभट्टाच्या उदाहरणावरून पाहता येईल. जयराशीभट्ट हा स्वतःला चार्वाकीय म्हणवतो. मात्र तो इतका बंडखोर निघाला की बृहस्पतीला अभिप्रेत असलेलं ‘प्रत्यक्ष प्रमाण’ सुद्धा त्याने नाकारलं. एवढंच नव्हे, तर चार्वकांनी स्वीकारलेली पंचमहाभूतेही त्याने नाकारली. तो म्हणतो, ‘जे बृहस्पतीला सुचलं नाही ते मला सुचलं ! मी बृहस्पतीच्याही पुढे गेलो !’ पण गंमत म्हणजे जयराशीभट्ट बृहस्पतीच्या पुढे गेला हे आह यांना सहन होत नाही.
ते त्याला चार्वाक मानायला तयार नाहीत, का कोण जाणे ! कारण त्या विधानाचा खुलासा त्यांनी केलेला नाही. ‘त्याला चार्वाक मानणं कठीण आहे’ एवढंच ते म्हणतात. त्यांच्या या भूमिकेला ‘दुटप्पीपणा’ शिवाय काय म्हणणार !
८.      ‘आजची परिस्थिती पाहिली तर शेवटी चार्वाकांचाच विजय झाला !’ असा निष्कर्ष शेवटी डॉ. आह काढतात. त्यासाठी आपल्या घटनेप्रमाणे आपण आज ‘निधर्मी’ कसे बनलो आहोत व चातुर्वर्ण्य व्यवस्था आज कालबाह्य कशी झाली आहे हे ते लक्षात आणून देतात. कारण चार्वाकांचा या दोन्ही गोष्टींना कडाडून विरोध होता.
परंतु आह सरांचा हा दावा पोकळ, आत्मसंतुष्टपणाचा व दिशाभूल करणारा आहे. माझ्या मते गुणकर्माधीष्ठीत चातुर्वर्ण्य व्यवस्था भारतात आज जेवढ्या यशस्वी प्रमाणात चालू आहे तितकी पूर्वी क्वचितच असावी. आज निरनिराळ्या क्षेत्रात प्रतिष्ठा पावलेले तज्ञ व सल्लागार हे एकप्रकारे ‘ब्राह्मण’च म्हणायला हवेत. राज्यांमधले व केंद्रातले राज्यकर्ते व पुढारी हे ‘क्षत्रिय’, वेगवेगळे उद्योगधंदे करणारे ते ‘वैश्य’ व उरलेला सेवा देणारा प्रचंड समाज म्हणजे ‘शूद्र’ होत. (यात लष्करी अधिकारी व सैनिकही आले !) यापैकी कुठल्याही वर्णात जन्मूनसुद्धा एखादा माणूस स्वतःच्या पसंतीने अन्य कुठल्याही वर्णात दाखल होऊ शकतो. याला गुणकर्माधीष्ठीत चातुर्वर्ण्य व्यवस्था म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं ?

‘आपण आज निधर्मी बनलो आहोत’ हा आह सरांचा दावाही असाच बाष्कळपणाचा आहे. आपण जर निधर्मी बनलेलो असू तर गल्लोगल्ली बोकाळलेली मंदिरे, त्यातल्या प्रचंड रांगा, रस्तोरस्ती चाललेले गणेशोत्सव किंवा दुर्गोत्सोव हे सगळं कशाचं द्योतक आहे ?

सारांश, चार्वाकाचं अवाजवी उदात्तीकरण करण्याचा डॉ.आ.ह.साळुंखे यांचा प्रयत्न प्रस्तुत पुस्तकात यशस्वी झालेला नाही हे त्यातील मुख्य मुद्दे चिकित्सेच्या कसोटीवर घासून पाहिल्यावर लक्षात येतं एवढंच मला दाखवून द्यायचं आहे.                                                                  .                                   

***

Saturday, July 9, 2016

बळीवंश,  एक थोतांड !
महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यासंगी विद्वान डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘बळीवंश’ या शीर्षकाचं पुस्तक लिहून आणखी एक वेगळाच विचारप्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात त्यांनी मांडलेले मुद्दे सारांशरूपाने खालीलप्रमाणे सांगता येतील,

एक, हिरण्यकश्यपूचा पणतू व प्रल्हादाचा नातू बळी हे इतिहासातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व होऊन गेलं. महात्मा फुले त्याला ‘कुळस्वामी’ म्हणतात. म्हणजे एकप्रकारे तो आपला (?) पूर्वजच झाला. तुळू भाषेत बळी म्हणजे वंश.
तुळूनाडू (कर्नाटक) ही बळीची भूमी म्हणून विख्यात आहे. 

दोन, बळी हा असुर होता व असुर हे भारतीय भूमीचे मूळ रहिवासी होते. मात्र त्यांचा ऐहिकवाद लोकांनी स्वीकारला नाही. लोक यज्ञयागाच्या मागे लागले. त्यामुळे त्यांची ‘धड हे नाही, धड ते नाही’ अशी स्थिती झाली. 

तीन, देवांनी असुरांना अनेकदा फसवलं, त्यांची निवासस्थाने नष्ट केली आणि हिरण्याक्षसारख्या ‘उजळ व निर्मळ’ दृष्टी असलेल्या असुरांना ठार मारलं. 

चार, वैदिकांनी बहुजनांच्या मनावर कब्जा करून त्यांना पराभूत केलं. 

पाच, भारतातील जनता केवळ ‘आर्य आणि अनार्य’ किंवा ‘ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर’ अशा दोनच वर्गात विभागली जाते. अनार्य किंवा ब्राह्मणेतर हे नकारात्मक संबोधन असल्यामुळे अशा जनतेने स्वतःला ‘बळीवंशीय’ म्हणवून घ्यावं.

या मुद्द्यांवर माझी प्रतिक्रिया खालीलप्रमाणे आहे.       
१.        जसा ‘आर्यवंश’ नावाचा कुठलाही वंश कधीही अस्तित्वात नव्हता, तसाच ‘बळीवंश’ असा प्रकारही कधी  अस्तित्वात नव्हता व नाही. तसा एकही पुरावा डॉ. आह यांनी आपल्या ‘बळीवंश’ या पुस्तकात दिलेला नाही. हा चक्क त्यांच्या ‘कल्पनेतून निघालेला’ वंश आहे.
२.       तुळू भाषेत ‘बळी’ या शब्दाचा अर्थ ‘वंश’ असा आहे असं गृहित धरलं तरी त्याचा अर्थ बळी नामक वंश अस्तित्वात होता किंवा आहे असा ते कसा लावू शकतात ? शिवाय तुळूनाडू हा प्रदेश बळीसाठी प्रसिद्ध आहे हे विधानही अतिरंजित- नव्हे, विपर्यस्तसुद्धा- आहे. केरळात बळीचं प्रस्थ आहे तसं तुळूनाडू या प्रदेशात अजिबात नाही. तुळूनाडू हा प्रदेश कुंदापूरपासून सुरु होऊन कासारगोडपाशी संपतो. त्यात उडुपी व मंगलोर ही शहरेही येतात. हा प्रदेश ‘यक्षगाना’साठी प्रसिद्ध असून ‘संगम’ काळात तिथे कोकर नामक लोक राहत होते. यांच्या इतिहासात बळीचा उल्लेख अजिबात येत नाही. पुढल्या राजांच्या इतिहासातही येत नाही.   आह यांनी बळीच्या ज्या कथा दिल्या आहेत त्यापैकी एका कथेत ‘बळी पूर्वेकडे गेला’ असा उल्लेख असून दुसऱ्या कथेत ‘दक्षिणेकडे गेला’ असा उल्लेख आहे. पण आह मात्र त्यातला ‘दक्षिणेकडे गेला’ एवढाच उल्लेख सोयीस्करपणे उचलतात व ‘पूर्वे’ कडे दुर्लक्ष करतात हे कितपत बरोबर आहे ?                
३.       बळी याचं खरं नाव इंद्रसेन हे होतं. तो बलाढ्य आणि लोकप्रिय असल्यामुळे वैदिकांनीच आपल्या वाडमयात त्याला उद्देशून ‘बळी’ किंवा ‘महाबळी’ म्हटलं आहे. पण आहसर त्याचा संबंध यज्ञात देण्याच्या बळीशी जोडून वैदिकांना दोष देतात. यासाठी गेल्या दहा हजार वर्षात एकाच विषयावर निर्माण झालेल्या अनेक बर्या वाईट कथा व त्यातल्या विसंगती यांचा ते फायदा करून घेतात. जिथे बळीच्या ‘फसवणुकी’चं वर्णन आहे तिथे ते वैदिकांना निंद्य लेखतात; मात्र चांगल्या गुणांचं वर्णन आहे तिथे ते फक्त बळीची स्तुती करत राहतात आणि ‘पुराणिक बळीचे चांगले गुण लपवू शकले नाहीत !’ अशी मखलाशी करतात. तटस्थ मांडणीचं हे लक्षण म्हणता येणार नाही.          
४.       महात्मा फुले यांनी आपल्या पोवाड्यात ‘बळी राज्यादी कुळस्वामीला’ असं म्हटलं असताना ‘ते आशयाशी जुळत नाही’ असं सांगून आहसर ‘बळी हाच कुळस्वामी’ असा स्वतःला सोयीस्कर अर्थ लावतात. एवढंच नव्हे तर ‘कुळस्वामी म्हणजे पूर्वज’ असा अजब तर्कही ते मांडतात हे बघून आश्चर्य वाटतं ! एखाद्याचा कुलस्वामी ‘रवळनाथ’ किंवा ‘खंडोबा’ असला तर तो त्याचा पूर्वज म्हणता येईल काय याचा विचार वाचकांनीच करून पाहावा. शिवाय महात्मा फुले कितीही मोठे असले तरी ते इतिहासाचे अभ्यासक नव्हेत. इतिहासाच्या प्रांतात त्यांचा शब्द प्रमाण मानण्याची गरज नाही.   
५.      अन्य कुठलाही आधार नसल्यामुळे आह यांनी सर्वत्र वैदिक वाडमयाचाच आधार घेतला आहे हे त्यांनी स्वतःच प्रास्ताविकात कबूल केलंय. फक्त अन्वयार्थ नि शब्दच्छल स्वतःला हवा तसा करून घेतला आहे. उदाहरणार्थ, ‘शंबरा’ वरून मराठीत ‘शंभर’ हा शब्द आला किंवा ‘पाणिनी’ हा ‘पणि’ (म्हणजे आर्यपूर्व व्यापारी) यांचा वंशज होता असली निराधार, हास्यास्पद विधाने त्यांनी केली आहेत. ती करण्यापूर्वी त्यांनी निदान कालनिश्चिती तरी करायला हवी होती किंवा दुसर्यांनी केलेली लक्षात घ्यायला हवी होती. पण तेवढे प्रयास त्यांनी घेतले नाहीत त्यामुळे ठायी ठायी कालविपर्यास झाला आहे. उदा. आर्य इ.स.पूर्व ७८०० च्या दरम्यान भारतात आले तेव्हा पणि सरस्वती नदीच्या काठी स्थायिक होते. त्यांचा आर्यांशी आधी संघर्ष व नंतर समेट होऊन ते वैदिक संस्कृतीत विरघळून गेले. इ. स. पूर्व १४०० हा ज्याचा काळ होता त्या पाणिनीशी त्यांचा संबंध कसा काय लावता येईल ? पाणिनीचे भाष्यकार कैय्यट आणि भट्टोजी दीक्षित हे पाणिनी या नावाची खालील व्युत्पत्ती देतात,
    ‘पणनं पण:  स विद्यते यस्य स: पणी  पणिन: अपत्यं पुमान पाणिन:  तस्य युवापत्यं पाणिनी: 
 म्हणजे पणिनचा मुलगा पाणिन व त्याचा नातू पाणिनी. 
 ‘पण’ शब्दापासून ‘पाणिनी’ शब्द साधला आहे असं थोर व्याकरणकारांचं मत आहे. पण डॉ. साळुंखे आकारण ही व्युत्पत्ती बदलतात. त्या भानगडीत कालविपर्यास होत आहे हे ते लक्षात घेत नाहीत. असाच प्रकार बृहस्पती किंवा शुक्र यांच्या बाबतीतही होतो. डॉ. साळुंखे यांचं पुस्तक वाचून ही मंडळी हजारएक वर्षं तरी जगली असावीत असा कुठल्याही अडाण्याचा समज होऊ शकतो.                
६.       बळीचा काळ आह यांनी ‘सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षे’ ठरवला आहे. पण महाभारतालाच पाच हजार वर्षे होऊन गेली आहेत. त्यापूर्वी हजार वर्षे आधी रामायण घडलं. योगवसिष्ठामध्ये वसिष्ठ रामाला बळीविषयी माहिती देतात असं आढळतं. (हे कदाचित प्रक्षिप्त असावं.) म्हणजे बळी किमान सात हजार वर्षांपूर्वी होऊन गेला हे यातून दिसतं. माझ्या मते बळी इ. स. पूर्व ७७०० च्या दरम्यान होऊन गेला. याविषयीचं सविस्तर विवेचन मी ‘आर्यभारत खंड २’ या माझ्या आगामी पुस्तकात केलं आहे.  
७.      बळी हा चांगला राजा होता हे पुराणांनीच सांगून ठेवलं आहे. त्याचा आजोबा प्रल्हाद याला बापाविरुद्ध केलेल्या बंडात आर्यांनी साथ दिली होती. त्यामुळे प्रल्हाद आर्यांना फार मानत होता असं दिसतं. (तो विष्णूभक्त होता यावर मात्र माझा विश्वास नाही. कारण विष्णू हा देव तेव्हा अस्तित्वात नसावा.) विरोचन आणि बळी यांनीही आर्यांना तेवढाच मान द्यावा अशी आर्यांची इच्छा असावी. (औरंगझेब व इराणचा शहा यांची इथे आठवण होते !) तेवढा मान न मिळाल्यामुळे आर्यांचा सेनापती वामन याने गनिमी काव्याने बळीचा पराभव केला. मात्र बळीने आर्यांचा मोठेपणा कबूल केल्यावर त्याचं राज्य त्याला परत दिलं गेलं. बळी परत राज्यावर आला तो दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्हणून वैदिकांनीच सुस्थापित केला. (आहसर मात्र ‘बलीप्रतिपदा म्हणजे बळीचा वध केल्याचा दिवस’ असा प्रचार करून लोकांच्या मनामध्ये किल्मिष उत्पन्न करत आहेत.)
८.       वैदिकांनी सप्तचिरंजीवात बळीचा समावेश केला याबद्दल तरी आह यांनी वैदिकांची पाठ थोपटायला हवी होती! पण ‘चिरंजीव’ या संबोधनाचा विपरीत अर्थ लावून आणि ‘केवळ हनुमान व बळी तेवढे आपले !’ असं विधान करून आहसरांनी आपण स्वतः ‘तटस्थ विद्वान’ नसल्याचं एका परीने सिद्धच केलं आहे.                      
९.       बळीचं राज्य दक्षिणेत नसून आजच्या मुलतानमध्ये होतं व ‘प्रल्हादपूर’ हे त्याचं प्राचीन नाव होतं. आर्यांनी भारतात प्रवेश केला तेव्हा हिरण्यकश्यपु त्यांना आडवा आला असणार हे उघड आहे. प्रल्हादाने बापाविरुद्ध केलेल्या बंडाला आर्यांची साथ मिळाली. मात्र ज्या नरसिंहाने हिरण्यकश्यपुचा वध केला तो आर्य नसून त्यांना मदत करणारा ‘यक्षवीर’ होता हे आता स्पष्ट झालेलं आहे. यक्षांच्या बावन्न वीरांपैकी नरसिंह हा एक वीर आहे. वैदिकांनी त्याला नंतर आपल्यात सामावून घेतलं. पण आह हे समजून घेऊ इच्छित नाहीत.  
१०.     असुर हे भारताचे मूळ निवासी असल्याचा आह यांचा दावाही चुकीचाच आहे. असुर हे मुळात मेसापोटेमिया प्रांतातील अरारात पर्वत व इराक इथे राहत होते. (अरारात म्हणजेच पूर्वीचा ‘उरर्तु’ म्हणजेच पूर्वीचा वृत्र पर्वत. देव नामक जमातीच्या वृत्राशी लढाया इथेच झाल्या.) याच प्रांतात पुढे असिरीयन (म्हणजे असुरांचे) साम्राज्य निर्माण झालं हे सुप्रसिद्धच आहे. काही असुर आर्यांप्रमाणेच भारतात येऊन स्थायिक झाले असावेत हे हिरण्यकश्यपू किंवा वृषपर्वा अशा राजांच्या उल्लेखांवरून दिसतं. मात्र भारत ही असुरांची मूळ भूमी नव्हे.
११.      देवांनी असुरांना फसवलं म्हणून आहसर तक्रार करतात, पण अशीच तक्रार ‘बुसातीन उस सलातीन’ या आदिलशाहीचा इतिहास सांगणार्या ग्रंथात शिवाजीराजांविषयीही केली आहे. ‘मासिरे आलमगिरी’ वगैरे ग्रंथांत राजांविषयी अशीच बोटे मोडली आहेत. मग आहसर राजांचा निषेध करणार आहेत काय ? बलाढ्य शत्रूशी गनिमी काव्याने लढणे म्हणजे फसवणं नव्हे हे उघड आहे.     
१२.    ज्या हिरण्याक्ष असुराचा आह यांनी गौरव केला आहे त्या हिरण्याक्षाविषयी ‘तो मातला होता !’ असं तुकोबा म्हणतात (क्षे.अ. ३३५) तर ज्ञानेश्वरांनी त्याला ‘दुराग्रही’ म्हटलं आहे. (११-६१) पण दर्शनीच तुकोबांचा अभंग देणारे आह याकडे कानाडोळा करतात.
१३.    ‘वैदिकांनी बहुजनांच्या मनावर कब्जा करून त्यांना पराभूत केलं’ या आह यांच्या विधानाला ऐतिहासिक दृष्टीकोनातून काहीच अर्थ नाही. इहवादी असुरांपेक्षा दैवी संपत्तीवर विश्वास ठेवणारे वैदिक लोकांना अधिक विश्वासार्ह वाटले हाच त्याचा अर्थ आहे. आणि वैदिक म्हणजे तरी कोण ? तर चारही वर्णांचे लोक म्हणजे वैदिक. त्यात आह यांचा तथाकथित बहुजनसमाजसुद्धा आला. शिवाय एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह लोकांना वारंवार व दीर्घकाळ (दहा हजार वर्षे !) फसवू शकत नाही असे इतिहासाचे दाखले आहेत. पण बहुजन म्हणजे जणू काही एक ‘निर्बुद्ध लोकांचा जमाव’ होता असा एकूण आहसरांचा अभिप्राय दिसतो.  मात्र हा अभिप्राय स्वीकारता येत नाही. बहुजन समाजाला चांगलं वाईट काय ते नीट समजत असतं.                  

१४.    आर्य-अनार्य किंवा ब्राह्मण-अब्राह्मण ही कृत्रिम विभागणी इंग्रजांनी ‘फोडा व झोडा’ या हेतूने केली. ती ब्राह्मणांनी केली नाही. आता आहसर अकारण ती विभागणी पुन्हा उकरून काढत आहेत. जे कधीच अस्तित्वात नव्हतं वा नाही, ते अस्तित्वात असल्याचा आभास डॉ. आह साळुंखे निर्माण करत आहेत व सर्वसामान्यांची दिशाभूल करत आहेत अशीच भावना हा साडेचारशे पानी ग्रंथ वाचून होते.